अमळनेर: येथील मंगळग्रह सेवा संस्थेस ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणेतर्फे धार्मिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याहस्ते ‘भारतीय सेवारत्न’ २०२३ पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. पुणे येथील एका हॉटेलात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, सेवेकरी प्रसाद खालकर, नितीन सोनवणे यांनी पुरस्कार स्वीकारला. यापूर्वीही मंगळग्रह सेवा संस्थेस विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक आदी क्षेत्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्य सुरु आहे. संस्थेच्या माध्यमातूनच जगातील एकमेव मंगळग्रह देवतेचे मंदिर विकसित झाले आहे. मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सामान्य जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्यासाठीही संस्थेने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या कार्याचीच दखल घेत ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनतर्फे ‘भारतीय सेवारत्न’ पुरस्कार देऊन संस्थेस गौरविण्यात आले.
ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा भारतातील सर्व सेवाभावी संस्थामधून एकमेव मंगळग्रह सेवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बेळगावे, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या