अमळनेर- मुबंई येथील कुलाब्यात इंडियन नेव्हीत कार्यरत असलेल्या अमळनेर सुपुत्रास कर्तव्यावर असताना वीरमरण आले असून सकाळी परेड सुरू असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. शुभम बाळाराव बिऱ्हाडे वय २७ वर्ष असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव असून अमळनेर येथे ताडेपुरा भागातील भीमनगर येथील ते रहिवासी होते, आज दि. २४ रोजी सकाळी कुलाबा येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्याठिकाणी शासकीय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर त्यांचे पार्थिव अमळनेरकडे आणण्यात येणार आहे, अमळनेर येथे ताडेपुरा स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान शुभम बिहाडे हे दहा वर्षांपूर्वी इंडियन नेव्हीत भरती झाले होते, तर दोन वर्षांपूर्वी मुंबई येथे कुलाब्यात त्यांची बदली झाली होती, याठिकाणी नेव्हीच्या बँन्ड पथकात ते कार्यरत होते, २३ रोजी सकाळी परेड सुरू असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, सदर बातमी अमळनेर येथे घरी कळविल्यानंतर आईवडिलांनी प्रचंड आक्रोश केला. संपूर्ण ताडेपुरा परिसरासह अमळनेरमध्ये शोककळा पसरली होती, आजीमाजी सैनिकांच्या खान्देशी रक्षक ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी लागलीच शहरात तेथे धाव घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक लहान बहीण असा परिवार आहे.
0 टिप्पण्या