Subscribe Us

लोकसभा-विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; 6 पैकी 3 राज्यांत भाजपला झटका


देशातील सहा राज्यांत लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. सहापैकी तीन राज्यांत भाजपला झटका बसला आहे. आंध्रात वायएसआर काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले.

दिल्लीत केजरीवालांचा करिष्मा कायम राहिला असून 'आप'च्या उमेदवाराने भाजपला पराभवाची धूळ चारली. उत्तर प्रदेशात मात्र भाजपने समाजवादी पार्टीच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. पंजाबमध्ये लोकसभेच्या जागेवर शिरोमणी अकाली दलाने बाजी मारली. देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्रिपुरामध्ये विधानसभेच्या चारपैकी तीन जागा भाजपने जिंकल्या, तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात पडली. मुख्यमंत्री माणिक साहा यांनी बारदोली मतदारसंघात काँग्रेसच्या आशीष साहा यांना 6,104 मतांनी पराभूत केले. त्यामुळे माणिक साहा यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची शाबूत राहिली आहे. आगरतळा मतदारसंघात काँग्रेसचे सुदीप रॉय बर्मन हे 3163 मतांनी विजयी झाले.

' आप ' ची पंजाबमध्ये हार ; राजधानीत जलवा कायम


पंजाबमध्ये सत्ताधारी असलेल्या आम आदमी पार्टीला संगरूर लोकसभेची जागा आपल्याकडे राखता आली नाही. या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) सिमरनजीत सिंग मान यांनी आपचे उमेदवार गुरमेल सिंग यांचा सात हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. दुसरीकडे दिल्लीत 'आप'चे दुर्गेश पाठक यांनी भाजपच्या राजेश भाटिया यांचा 11 हजारांच्या मतांच्या फरकाने पराभव केला.

झारखंडमध्ये काँग्रेसकडून भाजपचा दारुण पराभव


झारखंडमधील मांडर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या शिल्पी नेहा तिर्की 23517 मतांनी विजयी होऊन भाजपच्या गंगोत्री कुजूर यांचा दारुण पराभव केला. आंध्रातील आत्मकुर मतदारसंघात सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या मेकापती विक्रम रेड्डी यांनी कमाल करीत भाजपसह इतर सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले. रेड्डी यांनी तब्बल एक लाखाहून अधिक मते मिळाली, तर भाजपला अवघी 19 हजार मते पडली.

उत्तर प्रदेशात ' सपा ' ला बालेकिल्ल्यात हादरा


उत्तर प्रदेशातील रामपूर व आझमगढ या अखिलेश यादव यांच्या बालेकिल्ल्यावर भाजपने कब्जा मिळवला. आझमगढमधून भाजपच्या दिनेश लाल यादव निरहुआ यांनी समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव यांना 5 हजार मतांनी पराभूत केले, तर रामपूरमध्ये भाजपचे घनश्याम लोढी हे 40 हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या