चाळीसगाव-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलीसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. महाराष्ट्रातील ५१ पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक पोलीस उपनिरीक्षक राजाराम धर्मा भोई यांना प्रशंसनिय सेवेकरीता पोलीस पदक जाहीर झाले आहे. पोलीस पदक मिळाल्याने चाळीसगाव पोलीसांची मान उंचावली आहे. राजाराम धर्मा भोई हे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, चाळीसगाव येथे वाचक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते सन १९८६ मध्ये पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले. जळगाव शहर, भुसावळ तालुका, यावल, जिल्हापेठ, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भाग, जळगाव तसेच स्थानिक गुन्हे शाखा व जिविशा, नागरी हक्क संरक्षण इत्यादी ठिकाणी सेवा बजावल्यानंतर सन १९९३ मध्ये पोलीस विभागातर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेत ते उत्तीर्ण झाले व नोव्हेंबर २०२० पासून ते पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. पोलीस दलात सेवा करतांना राजाराम भोई यांनी खून, जबरी चोरी, बलात्कार, घरफोडी/चोरी यासारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनिय कामगिरी बजावली.
आजपावेतो त्यांना चांगल्या कामगिरीबद्दल तब्बल १८३ बक्षिसे मिळाली आहेत. तर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन २०११ मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. आता पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेत त्यांना केंद्रीय मंत्रालयाने प्रशंसनिय सेवेकरीता पोलीस पदक जाहीर केले आहे. त्यांच्या रूपाने हा सन्मान जाहीर झाल्याने चाळीसगाव परिमंडळातील पोलीस दलाची मान उंचावली आहे. पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या