राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद अमरावती द्वारा आयोजित ऑनलाईन शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न
अमरावती: दरवर्षीप्रमाणे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या कार्यक्रमांतर्गत 29 व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये 10 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्यांना वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे ज्ञान व्हावे या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात. सदर परिषदेचे आयोजन जिल्हा, विभागीय,राज्य आणि राष्ट्र अशा विविध पातळ्यांवर करण्यात येते. महाराष्ट्र राज्यात जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ही संस्था राज्य समन्वयक संस्था म्हणून कार्य करीत आहे. सन 2020-21 व 2021-22 या दोन शैक्षणिक वर्षांकरिता बाल विज्ञान परिषदेचा मुख्य विषय शाश्वत जीवनासाठी विज्ञान असा असून याअंतर्गत खालील पाच उपविषय ठरविण्यात आले आहेत. 1)शाश्वत जीवनासाठी परिसंस्था. 2)शाश्वत जीवनात योग्य असे तंत्रज्ञान. 3)शाश्वत जीवनासाठी सामाजिक नाविन्य 4)शाश्वत जीवनासाठी आराखडा,विकास कार्य,नियोजन,नमुना प्रतिकृती 5)शाश्वत जीवनातील पारंपारिक ज्ञान. अमरावती जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांनी प्रत्येक वर्गातील 10 ते 17 वर्षे वयोगटातील दोन विद्यार्थ्यांचा गट करून वरील कोणत्याही विषयावरील एक प्रकल्प निवडावा व https://forms.gle/eza5b7fCnwdq6qse7 या गुगल फॉर्म मध्ये 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन नोंदणी करून 15 नोव्हेंबर पर्यंत प्रकल्प पूर्ण करावा.15 नोव्हेंबर नंतर जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.अमरावती जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना प्रकल्प कसा तयार करावा याबाबत माहिती होण्यासाठी ऑनलाइन शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.मा.डॉ.एल.पी.नागपूरकर सर,विभाग प्रमुख,एम.बी.पटेल महाविद्यालय,साकोली यांनी वरील विषयावर सखोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अमरावती जिल्हा समन्वयक श्री दत्तात्रय देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन,आभार प्रदर्शन व आयोजन अमरावती जिल्हा शैक्षणिक समन्वयक अतुल ठाकरे यांनी केले. कार्यशाळेला जिल्ह्यातील बहुसंख्य विज्ञान शिक्षक उपस्थित होते.