कौशल्याधिष्ठित शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभाग वाढवावा : मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन
पंचायत समिती तुमसरच्या 'मिशन स्कॉलरशिप' या पथदर्शी उपक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन
भंडारा : दि. १५ सप्टेंबर इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आदी शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये तुमसर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ शिक्षक मार्गदर्शकांच्या सहकार्याने सन २०१९ - २० पासून विजय आदमने (गशिअ) यांच्या संकल्पनेतून व धिरज पाटील (गविअ) यांच्या मार्गदर्शनात निःशुल्क मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करित असलेल्या 'मिशन स्कॉलरशिप' या पथदर्शी उपक्रमाचे दि. १५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभाग वाढवावा असा मनोदय व्यक्त केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०२१ - २२ या शैक्षणिक सत्रात शिष्यवृत्ती वर्गाचे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने दि. १५ सप्टेंबर २०२१ ते १५ मार्च २०२२ या कालावधीत सोमवार ते शनिवार दररोज घेण्यात येणार आहे. तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यांतील तज्ञ मार्गदर्शक शिक्षक व अधिकारी यांचे गेस्ट लेक्चरसुद्धा घेण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आभासी उद्घाटन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर हे होते तर विशेष अतिथी म्हणून संजय डोर्लीकर, पंचायत समिती तुमसरचे खंड विकास अधिकारी धिरज पाटील व जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी लाभले होते. तसेच कार्यक्रमाला तुमसरच्या गट साधन केंद्रांतर्गत कार्यरत सर्व अधिकारीवर्ग, सर्व केंद्रप्रमुख, तुमसर तालुक्यातील व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक व शिक्षक बहूसंख्येनी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा नंदेश्वर महालगाव यांनी केले. आभार ज्योती नागलवाडे कुरमुडा यांनी मानले तर तांत्रिक सहाय्य कैलास चव्हाण सोरणा यांनी केले.
मनोगत - १) मिशन स्कॉलरशिप हा विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावण्याच्या दृष्टिकोनातून मैलाचा दगड ठरेल. - विनय मुन (मुख्य कार्यकारी अधिकारी) २) शिष्यवृत्ती परीक्षेत तुमसर तालुका नागपूर विभागात अग्रेसर राहील यासाठी व सैनिकी शाळेत भंडारा जिल्ह्यातून पहिला विद्यार्थी तुमसर तालुक्याचाच प्रवेश घेईल यासाठीही प्रयत्न व्हावेत. - संजय डोर्लीकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक) ३) स्पर्धा परीक्षांच्या स्वरूपानुसारच विद्यार्थी व पालक यांना उचित मार्गदर्शन करून शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात भंडारा जिल्ह्याचा टक्का वाढवावा. - मनोहर बारस्कर (शिक्षणाधिकारी प्राथमिक) ४) तुमसर तालुक्याने मिशन स्कॉलरशिप उपक्रमाद्वारे भंडारा जिल्ह्यात शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये बाजी मारून जिल्ह्यापुढे एक आदर्श ठेवावा. मी सदैव सोबतच आहे. - धिरज पाटील (खंड विकास अधिकारी, पं. स. तुमसर) ५) विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी व तुमसर तालुक्यातील विद्यार्थी भविष्यात अधिकारी बनावेत याच हेतूने मिशन स्कॉलरशिप हा पथदर्शी उपक्रम तुमसर तालुक्यात मागील तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. - विजय आदमने (गटशिक्षणाधिकारी, पं. स. तुमसर)
बातमी संकलन - दामोधर डहाळे (स. शि.) जि. प. पूर्व माध्य. शाळा मांडवी पं. स. - तुमसर, जि. प. - भंडारा
0 टिप्पण्या